रुग्णालयांची आरोग्यतीर्थे व्हावीत

सकाळ वृत्तसेवा Friday, August 27, 2010 AT 12:15 AM (IST)

पुणे - "वैद्य स्वतः शुद्ध प्रवृत्ती, प्रकृती आणि आचारविचारांचा असेल तरच त्याला रुग्णाच्या व्याधी समजतील आणि रोगाचे अचूक निदान होईल. डॉक्‍टर व त्यांच्या उपचारांबाबत रुग्णांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी "रुग्णालयाचे आरोग्यतीर्थ' अशी नवी संकल्पना साकारायला हवी. त्यासाठी वैद्यांनी स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा,'' असे आवाहन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी गुरुवारी येथे केले. 

"महाराष्ट्र आयुर्वेद संमेलना'च्या पुणे जिल्हा शाखेतर्फे वैद्यभूषण गणेशशास्त्री जोशी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात "अध्यात्म व आयुर्वेद' या विषयावर तांबे यांनी मार्गदर्शन केले. वैद्य उमा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. संमेलनाच्या अध्यक्ष वैद्य शशी अहिरे, पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष वैद्य विवेक साने उपस्थित होते. या प्रसंगी श्री तांबे यांच्यासह ज्येष्ठ वैद्य प. य. वैद्य खडीवाले, वैद्य शं. पा. किंजवडेकर, वैद्य तात्या जळूकर, वैद्य सुभाष रानडे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. श्री तांबे म्हणाले, ""अध्यात्म व आयुर्वेद या संकल्पना वेगळ्या करता येणार नाहीत. अध्यात्मात जीवन सुखी करण्याचे मार्गदर्शन सामावले आहे; तर आयुर्वेदात व्याधींपासून मुक्तीचे. काम, क्रोध असे विकार त्यजून; तसेच प्रेमभावनेने इतरांना मदत करण्याची वृत्ती अंगी येत नाही तोपर्यंत आध्यात्मिक होता येत नाही. त्यासाठी रुग्णांबाबत आत्मीयतेने उपचार करण्याची प्रवृत्ती वाढणे गरजेचे आहे. रुग्णांना विश्‍वासाचे वातावरण देण्यासाठी रुग्णालयांची आरोग्यतीर्थे व्हायला हवीत. रुग्णाचे कौटुंबिक ताणतणाव, पूर्वग्रह दूर केल्यास त्याची अर्धी व्याधी बरी होते. आपले धार्मिक उत्सव व व्रतवैकल्यांची रचनाही आध्यात्मिकता वाढण्यासाठी व आरोग्य रक्षणाच्या दृष्टिकोनातूनच करण्यात आली आहे. कर्म, आचारविचारांची शुद्धी झाल्यास मोक्ष मिळतो, हे तत्त्व आयुर्वेदानेही स्वीकारले आहे. म्हणूनच प्रकृतीच्या नियमांनुसार दिनचर्या ठेवून आचरण करणे गरजेचे आहे.'' 

आयुर्वेद, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती वाढवावी, असे आवाहनही डॉ. श्री तांबे यांनी उपस्थितांना केले. वैद्य योगेश गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.